January 09, 2006

विंदांना ज्ञानपीठ !

ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि कवी विंदा करंदीकर ह्यांना भारतीय साहित्यातील सर्वात प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ही बातमी वाचताच आलेली पहिली आठवण म्हणजे विंदांच्या बालकवितांची पुस्तके - अजबखाना आणि एटू लोकांचा देश. अगदी लहानपणी आईबाबांनी ह्यातल्या वाचून दाखविलेल्या काही कविता अजूनही लक्षात आहेत. आहेतच त्या खास! ( अर्थात आता मात्र विंदांच्या इतर कविता वाचायल्या हव्यात ! )

विंदांच्या अजबखान्यातील माझ्या आवडत्या काही कविता:

मैफल
एक झुरळ
रेडिओत गेले;
गवयी होऊन
बाहेर आले.
एक उंदीर
तबल्यात दडला;
तबलजी होऊन
बाहेर पडला.
त्या दोघांचे
गाणे झाले
तिकीट काढून
मांजर आले!

आटपाट नगरामध्ये
आटपाट नगरामध्ये
नाही होत चोरी;
हुशार मुले काळी; आणि
खुळी मुले गोरी.
आटपाट नगरामध्ये
किती किती मजा
प्रधान भरतो पाणी; आणि
रस्ते झाडतो राजा.
आटपाट नगरामध्ये
नाही चालत नाणी;
एक शेर गुळासाठी
दहा-बारा गाणी!
आटपाट नगरामध्ये
सुटी नाही, बाळा,
सांग कशी सुटी असेल,
जर नाही शाळा?

एटू लोकांचा देश : वाङमय
जर कोणी
कविता केली,
प्रथम पुरतात
जमिनीखाली
पण जुनीशी
झाल्यानंतर
शहाणे करतात
जंतर-मंतर !
मग कवितेतून
रुजतो वृक्ष;
फुले येतात
नऊ लक्ष !

एटू लोकांचा देश : शिक्षण
एटूंच्या देशांत
सक्तीचे खेळ;
मुलांना नसतो
शिकायला वेळ

म्हातारे देतात
परीक्षा शंभर;
मेल्यानंतर
कळतो नंबर !