June 04, 2007

द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट

सलाम! तुम्हाला काही मदत हवी आहे का? असे दचकू नका! माझी दाढी भरघोस आहे खरी, पण माझं अमेरिकेवर प्रेम आहे. मला वाटले तुम्ही काहीतरी शोधताय. पण खरे तर तुमचा हा शोध साधासुधा नाही, ती एक मोहीमच दिसतेय. ह्या शहराचा माहीतगार रहिवासी आणि तोही तुमची भाषा जाणणारा - मला वाटले मी तुम्हाला ह्या कामात काहीतरी मदत करू शकेन.

तुम्ही बुचकळ्य़ात पडलेले दिसताय - ह्या दाढीवाल्याला कसं कळलं की मी अमेरिकन आहे? छे छे, तुमच्या गोरया चमडीवरून नाही - आमच्या देशातही विविध रंगाची माणसं आहेत, तुम्ही त्यातल्या वायव्य सरहद्द प्रांतातले म्हणून सहज खपाल. तुमच्या कपड्यांवरूनही अंदाज बांधणे मुश्किलच आहे. तुमचा हा रुबाबदार शर्ट आणि त्यावरून चढवलेला हा झकास एक खिशाचा सूट डे मोईन, आयोवा मध्ये कुणा युरोपियन टुरिस्टलाही मिळाला असता. तुमचे बारीक कापलेले केस, आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ही भरदार छाती - तुम्ही नक्कीच रोजचा दंड-बैठकांचा व्यायाम करत असणार - हे एका विशिष्ट प्रकारच्या अमेरिकनाचे लक्षण आहे खरे. पण तेही कारण नव्हेच, सगळयाच देशातले खेळाडू आणि सैनिक साधारणपणे सारखेच दिसतात. नाही, खरे तर मी तुम्हाला तुमच्या "ढंगावरूनच" ओळखले. नाही नाही, असे रागावून पाहू नका - अपमान म्हणून नव्हे, नुसते एक निरीक्षण म्हणून मी हे म्ह्टले.


वरील विलक्षण वाक्यांनी सुरू होणारे मोहसीन हमीद ह्या पाकिस्तानी लेखकाचे "द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट" हे दुसरे पुस्तक प्रकाशित होण्याआधीपासूनच गाजते आहे. वाचकाला तात्काळ खेचून घेणारे हे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि वाचून संपल्यानंतरही वाचकाच्या मनाचा कब्जा घेते. पाश्चात्य आणि तिसरया जगातील तुटत असणाऱ्या नात्याचा वेध ह्या पुस्तकात घेतला आहे.

लाहोरमधील गल्ली-बोळांतील एका छोट्याशा हॉटेलमध्ये दोन व्यक्तींची गाठ पडते. गोष्ट सांगणारा दाढीवाला मनुष्य म्हणजे चंगेझ नावाचा एक तरूण पाकिस्तानी. तो ज्याच्याशी बोलतोय ती व्यक्ती कधीच वाचकासमोर येत नाही. त्यामुळे चंगेझ सांगत असलेल्या गोष्टींवरूनच समोरच्या माणसाबद्दल तर्क-वितर्क लढवावे लागतात. अशा काहीशा चमत्कारिक परिस्थितीमध्ये वाचक कायम संभ्रमात पडतो, आणि गोष्टीची एकच बाजू ऎकत असल्यामुळे साहजिकच समोरच्या अमेरिकनाच्या भूमिकेबद्दलही विचार करू लागतो.

अशा अविश्वासात सुरु झालेला हा संवाद मग चंगेझच्या बोलण्यातून उलगडत जातो. चंगेझ अमेरिकेतील प्रथितयश अशा प्रिन्स्टन विद्यापीठाचा पदवीधर आहे. इतर परदेशी विद्यार्थ्यांप्रमाणेच तोही आपल्या वर्गांतील अमेरिकन विद्यार्थ्यांपेक्षा कांकणभर सरसच आहे. प्रिन्स्टन मधून बाहेर पडताना अवघ्या एक-दोघांना मिळणारी अंडरवूड-सॅमसन ह्या प्रथितयश अमेरिकन कंपनीतील नोकरी चंगेझला सहज मिळून जाते. त्याचबरोबर एरिका नावाची एक सुंदर अमेरिकन मुलगीही त्याच्या प्रेमात पडते. न्यू यॉर्क सारख्या जागतिक शहरात राहणारा चंगेझ कामाच्या धबडग्यात आणि एरिकाच्या प्रेमात बुडून जातो. अमेरिकेचा काठ धरणाऱ्या इतर परदेशी तरुणांसारखीच अमेरिकन समृद्धीची स्वप्ने बघू लागतो. ह्या सगळ्यामध्ये त्याच्या मनात मात्र कुठेतरी पाल चुकचुकत राहते.

लाहोरच्या घरची, तिथल्या ताज्या अन्नाची आणि तिथल्या बालपणाची आठवण मधूनच डोके वर काढते, कुठेतरी खुपत राहते. वरवर पाहता अमेरिकेत पूर्णपणे रुळलेला, तिथल्या वातावरणाशी एकजीव झालेला चंगेझ आपल्या देशाचे मागासलेपण आणि दारिद्र्य विसरू शकत नाही. त्याचबरोबर मोहेंजोदारो सारख्या प्रगत संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या, हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि त्या तुलनेत आजच्या जगातील पाकिस्तानचे स्थान त्याला अस्वस्थ करते. त्याचे हे वेगळेपण आणि संवेदनशीलता इतर कुणाच्याही लक्षात आली नाही तरी एरिका समजून घेते.

एरिकादेखील एका विचित्र परिस्थितीत अडकली आहे - तिचा लहानपणापासूनचा मित्र आणि प्रेमी असलेला ख्रिस काही वर्षांपूर्वीच कॅन्सरने गेला. त्याच्या जाण्यानंतर एकटी पडलेली एरिका आता कुठे त्या धक्क्यातून सावरतेय. पण ती ख्रिसला विसरू शकत नाही. तिचे आणि चंगेझचे संबंध अशा प्रकारे एक विचित्र प्रेमत्रिकोणात बांधले गेले आहेत. भूतकाळात असलेला हा तिसरा कोन चंगेझच्या प्रेमाच्या आड येतो. वैयक्तिक पातळीवर अशा गोष्टींना सामोरा जाणाऱ्या चंगेझच्या मनात एक भलतीच गोष्ट एक वादळ निर्माण करते - सप्टेंबर ११, २००१ !

कामानिमित्त फिलिपाईन्स मध्ये असलेला चंगेझ वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळताना बघतो. आणि पहिल्याप्रथम त्याच्या चेहऱ्यावर उमटते हास्याची एक लकीर. आपल्याच ह्या प्रतिक्रियेने चंगेझ दचकून जातो. आजवर दडपून ठेवलेले स्वतःबद्दलचे अनेक प्रश्न अचानक उफाळून येतात. अमेरिकेला परतताना विमानतळावर चंगेझची झाडून तपासणी होते. आजवर आपल्याच विचारांत गढून गेलेले न्यू यॉर्कचे लोकल प्रवासी त्याच्याकडे वळून वळून पाहू लागतात. ऑफिसातील इतर लोकांनाही अचानक तो पाकिस्तानी असल्याचा साक्षात्कार होतो.

चंगेझच्या मनातील ही घालमेल सुरु असतानाच एरिकादेखील ख्रिसच्या आठवणींत हरवून त्याच्यापासून दूर जाते. पाकिस्तानच्या सहकार्याने अमेरिका अफगाणिस्तानवर हल्ला चढवते. आजवर टेलेव्हिजनवर फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे खेळ बघणारे अमेरिकन्स आता युद्धाचा अमानुष खेळ बघू लागतात. आणि चंगेझ बदलू लागतो. लाहोरला धावती भेट देतो. आपल्याच घरात पाऊल टाकताना चंगेझला विचित्र वाटते. जुनाट घर, पोपडे निघालेल्या भिंती, आजूबाजूची गर्दी हे सर्व काही त्याला अनोळखी आणि स्वतःच्या अमेरिकन जीवनापासून फार दूर आणि विसंगत भासू लागते. चंगेझ पुन्हा दचकतो. आपल्या घरातील ह्या बदलावद्दल विचार करताना अचानक त्याला जाणीव होते - बदल घरात नसून स्वतःतच असल्याची!

लाहोर वास्तव्यात चंगेझला भारत-पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती दिसते. आपले आप्त-स्वकीय युध्दाच्या छायेत असताना स्वत: अमेरिकेला परत येणे त्याला कठीण होते. पाकिस्तान आणि अमेरिकेतील हे फरक पाहता-पाहताच चंगेझला आपल्यातीलच विसंगती, दुभंगलेपण दिसून येते. विचारांच्या अशा गर्तेत सापडलेला चंगेझ अमेरिकेला परत येताना दाढी वाढवून येतो.

चंगेझच्या मनात इतिहास आणि वर्तमान तसेच आपलीच स्वप्ने आणि भोवतालच्या जगातील वास्तव ह्यांमधील अंतर वाढत जाते. अमेरिकेला येणाऱ्या लाखो परदेशी तरूणांप्रमाणेच भौतिक सुखाची स्वप्ने बघणारा, अमेरिकन मुक्त संस्कृती - उदारमतवादीपणावर विश्वास ठेवणारा चंगेझ मग काहीशा अनिच्छेनेच अमेरिकाविरोधी विचारांकडे आकर्षित होतो. आजवर स्वतःवर संपूर्ण ताबा असलेला, दोन जगांतील फरकांतूनही आपल्या आयुष्याचा तोल सांभाळून असलेला हा अमेरिकाशिक्षित पाकिस्तानी तरूण हळूह्ळू एक "रिलक्टंट फंडामेंटलिस्ट" बनतो.

आपली गोष्ट सांगताना चंगेझ समोरच्या अमेरिकनाबद्दलही सांगत राहतो, वाचकाला खुणावत राहतो. त्याच्या उजव्या बाहीखाली काय दडले असावे? लाहोरच्या ह्या पुरातन भागात तो काय बरे शोधत असावा? बरोबर तासाच्या ठोक्याला त्याच्या फोनची रिंग का बरे वाजत असावी? आणि, तो सतत संशयाने आजूबाजूला का बघत असावा? अनेक प्रश्न वाचकासमोर उभे राहतात. आणि हा सस्पेन्स पुस्तकाची संपूर्ण दोनशे पानं टिकतो.

अमेरिकेचे आक्रमक स्वरुप जगापुढे येणे आणि चंगेझचा तोल ढळणे ह्या दोन्ही गोष्टी एकापाठोपाठ घडतात. वरवर पाहता साध्यासुध्या वाटणाऱ्या गोष्टीदेखील असाधारण मन:स्थितीत असलेल्या माणसावर चमत्कारिक परिणाम करतात. जगावर आधिपत्य गाजवण्याची सवय झालेल्या अमेरिकन सरकारची सप्टें ११ नंतरची प्रतिक्रिया अशीच प्रमाणाबाहेर आक्रमक झाली. स्वत:च्या भूमीवरचा हल्ला पचविण्याची ताकदच अमेरिकेकडे उरली नाही. "लिबरल" मुक्त विचारसरणीची, आविष्कारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही मूल्यांचे माहेरघर असलेली अमेरिका मागे पडली आणि तिच्या जागी अमेरिकन पद्धतीचा फंडामेंटलिझम - "US" v. "Them" - ची उद्दाम भावना आली.

हल्ल्यांनंतर सगळ्या जगाची साहजिकच मिळालेली सहानुभूती अफगाणिस्तान आणि पाठोपाठ इराकवर हल्ला करून अमेरिका गमवून बसली. ह्या देशांतील लाखो सामान्य नागरिकांचे आयुष्य अमेरिकेच्या अतिरेकी आक्रमक वृत्तीमुळे बदलून गेले. साहजिकच ह्या दोन्ही देशांमध्ये आणि जगभरच्या संवेदनशील नागरिकांमध्ये (त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिकनही आलेच)अमेरिकाविरोध वाढला.

अमेरिकन संस्कृतीच्या वाढत्या प्रभावाखाली येणाऱ्या आणि अमेरिकेच्या चुंबकीय क्षेत्रात सहजी आकर्षित होणाऱ्या आजच्या भारतीय तरुणांसमोरदेखील हे विसंवाद आहेत. वरवर पाहता अमेरिकन पद्धतीच्या श्रीमंतीला, चंगळवादाला रुळावलेल्या लोकांच्या मनातही काहीतरी खदखदते आहे. अमेरिकेची श्रीमंती सहज आपलीशी करणारे अनेक वरकरणी मॉडर्न लोक आविष्कारस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्यासारख्या मूल्यांना मात्र स्वीकारु शकलेले नाहीत. दुर्दैवाने अमेरिकादेखील आपले ते स्वरुप विसरू लागली आहे.

दहशतवादी हल्ल्यांनंतर जगाकडे एका वेगळ्या, उद्दाम दृष्टीने बघणाऱ्या अमेरिकेची ही तसबीर चंगेझ त्या निनावी अमेरिकनासमोर उभी करतो. ही तसबीर वाचकालाही विचारप्रवृत्त करते. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगातील मोठे आणि सूक्ष्म फरक ह्या कादंबरीची पार्श्वभूमी आहेत. एकाच वेळी मॉडर्न जगाचे आकर्षण आणि आपल्या परंपरेचा अभिमान असलेल्या तिसऱ्या जगातील नवीन पिढीचे संभ्रम ही कादंबरी मांडते. अमेरिकेचा दुहेरी चेहरा - साम्राज्यवादी, मुजोर, दादा देश आणि बाहेरच्यांना सामावून घेणारा मेल्टिंग पॉट - देखील वाचकासमोर येतो. कादंबरीतील चंगेझ आणि समोरचा अमेरिकन ह्या दोन्ही प्रवृत्तींची प्रतिके आहेत.

प्रत्येक वाचकाला आपापले पूर्वग्रह तपासून पाहायला लावणारी, जगाच्या पटावर उलगडणाऱ्या राजकीय नाट्याला वैयक्तिक पातळीवर आणणारी ही कादंबरी. जरूर वाचा!




मोहसीन हमीद ह्यांचा जन्म लाहोर, पाकिस्तान मध्ये झाला. त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन आणि हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. "Moth Smoke" ही त्यांची पहिलीच कादंबरी गाजली. ती दहा भाषांमध्ये अनुवादित झाली आहे.


द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट

लेखक: मोहसीन हमीद
प्रकाशक: पेंग्विन-व्हायकिंग
पृष्ठे: १९२
किंमत: रु. २९५/-

2 comments:

Nandan said...

pustakacha uttam parichay karun dilaat. barach aikala hota ya pustakabaddal, aata tumacha lekh vachoon vaachayachi utsukata ajoon vadhali aahe.

Amod said...

Mima..

I am by no means an avid reader..
I even fell asleep within 2 pages of Harry Potter!! but after reading such a good book-review, I am motivated to buy a copy and read this one!

- Amod

Post a Comment